14 ऑगस्ट रोजी लाख लागवड आणि निर्यात विषयावर कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 12 : केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूर येथील विदेश व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) च्यावतीने चंद्रपूर येथील नियोजन भवनात 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ‘लाख लागवड आणि निर्यात’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत उष्ण कटिबंधीय वन संशोधन संस्थेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ननिता बेरी यांचे ‘लाखेच्या लागवडीच्या वैज्ञानिक पद्धती, मूल्यवर्धनाची व्याप्ती आणि विपणन तंत्र’ यावर व्याख्यान होईल.
विपुल वनसंपदेसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात विविध लघु वनोपजांची लागवड आणि त्यांची निर्यात करण्याची मोठी क्षमता आहे. लाखचा वापर जागतिक स्तरावर नैसर्गिक मेण, रंग आणि पॉलिश म्हणून तसेच सिमेंट, औषधी, सौंदर्य प्रसाधने आणि इलेक्ट्रिकल उद्योगांमध्ये केला जातो. पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पादनांसाठी लाख या वनस्पतीजन्य पदार्थाचे महत्त्व जागतिक बाजारपेठेत वाढत आहे. डीजीएफटी नागपूर क्षेत्र कार्यालयाच्या वतीने या एक दिवसीय नि:शुल्क कार्यशाळेच्या माध्यमातून शेतक-यांमध्ये आधुनिक शेती तंत्राविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, नियम आणि कायद्यांची माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शन केले जाईल.
जंगलात आणि आसपास राहणारे आदिवासी वन उत्पादनांच्या संकलन आणि विपणनातून त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लावतात, त्यांनाही कार्यशाळेचा फायदा होईल. डीजीएफटी नागपूर क्षेत्र कार्यालयाचे अधिकारी लाख निर्यातीसाठी विदेशी व्यापार धोरण 2023 अंतर्गत उपलब्ध प्रोत्साहन योजना बद्दल उपस्थितांना माहिती देतील. त्याचप्रमाणे डाक विभागाचे अधिकारीसुद्धा निर्यात प्रक्रियेसंदर्भात माहिती देतील. लाख आणि इतर लघु वनोपजांची लागवड, संकलन, प्रक्रिया आणि व्यापारात सहभागी असलेल्या सर्वांसाठी कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन अतिरिक्त विदेश व्यापार महासंचालक स्नेहल ढोके यांनी केल्याचे जिल्हा उद्योग केंद्राने कळविले आहे.
००००००