जिल्ह्यात साडेपाच लाखांवर नागरिकांची कुष्ठरोग तपासणी
Ø 15 ते 31 जुलै या कालावधीत विशेष कुष्ठरोग शोध अभियान
चंद्रपूर, दि. 16 : कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याकरीता भारत सरकारने सर्व राज्यांना प्रत्येक जिल्हयाकरीता ‘जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा’ तयार करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्हयातील कुष्ठरुग्णांचे प्रमाण लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दर तीन महिन्याने विशेष कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार असून यातील दुसरी फेरी 15 ते 31 जुलै 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 5 लक्ष 55 हजार 806 नागरिकांची तपासणी करण्यात येईल.
जिल्हयात कुष्ठरोगाचे रुग्ण असलेली 327 गावे असून सदर गावांमध्ये नवीन कुष्ठ रुग्णांचे भविष्यात प्रमाण शून्यावर आणण्याकरीता सन 2023 ते 2027 या चार वर्षाच्या कालावधीत तसेच राजुरा तालुक्यातील कुष्ठरोगाकरीता संवदेनशील असलेल्या 20 गावात लेप्रा सोसायटी, सिकंदराबाद या सामाजिक संघटनेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कुष्ठरोगासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येणारी पहिली मोहिम ठरली. सदर मोहिमेसाठी 500 पथक गठीत करण्यात आल्या असून 1 लक्ष 37 हजार 80 घरांना भेटी दरम्यान 5 लक्ष 55 हजार 806 नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहे. पथकाच्या माध्यमातून घरामधील सर्व सभासदांची कुष्ठरोग आजारासाठी शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे.
अशी आहेत कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट /लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भूवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी.
विशेष कुष्ठरोग शोध मोहिमेत गावातील सर्व नागरीकांनी पथकामार्फत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मीना साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे व सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम यांनी केले आहे.