16 व 17 जुलै रोजी उर्स निमित्त भाविकांकरीता कारागृह खुले
चंद्रपूर, दि.9 : चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात मुख्य तट क्र. 2 जवळ पुज्य हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोहर्रम सणानिमित्त 16 व 17 जुलै 2024 हे दोन दिवस कारागृह भाविकांसाठी खुले राहणार आहे.
कारागृहात पुर्व प्रथेप्रमाणे उर्स यात्रा आयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरीता मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीच्या दर्शनासाठी श्रध्दाळू भाविक लोकांची खुप गर्दी असते. सदर कालावधीत कारागृहाचे आतील समाधीच्या दर्शनाकरीता प्रवेश देण्यात येणार असून कारागृहाच्या आत कोणत्याही भाविकाला मोबाईल फोन, कॅमरा, खाद्यपर्दाथ उदा. पेढे, बर्फी अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येणार असल्याने, नियमांचे अनुपालन करूनच समाधीस्थळी दर्शनाकरीता यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केले आहे.