जिल्हा सामान्य रुग्णालयात दृष्टीदान दिन

0
64

जिल्हा सामान्य रुग्णालयात दृष्टीदान दिन

 

चंद्रपूर, दि. 12 : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षिणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरच्या वतीने नेत्रविशारद डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, अति.निवासी अधिकारी डॉ. बंडू रामटेके, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. आडे, डॉ.प्रिती उराडे, डॉ. सरोदे, डॉ.पटेल,डॉ. मेश्राम व जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. पद्मजा बोरकर आदि उपस्थित होते.

 

यावेळी डॉ. चिंचोळे म्हणाले, नेत्र विशारद डॉ.भालचंद्र हे शासकीय सेवेत असतांना त्यांनी अंधत्व निर्मूलन कार्यक्रमामध्ये 80 हजाराच्या वर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहिनांचे जीवन प्रकाशमय केले. तसेच त्यांनी नेत्रदान सारख्या महान कार्याचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहचविले. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून 10 जून हा दिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केल्या जातो. मृत्युनंतर मानवी डोळे हे सहा तास जिवंत राहतात आणि मरणोपरांत डोळे दान केल्यास इतर अंध नागरिकांना त्याचा फायदा होऊ त्यांना हे जग बघता येईल, त्यामुळे नागरिकांनी मरणोपरांत दृष्टीदानाकरीता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने 2023-24 करीता मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट 4570 असतांना 5099 शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून शासकिय संस्थेत मोतिबिंदू शस्त्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात चंद्रपूरने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षिणता नियंत्रण, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरच्या टिमने उत्तम कामगिरी केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांच्या हस्ते यावेळी नेत्रशल्य चिकित्सक डॉ. सरोदे व डॉ. पटेल यांना शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच नेत्र विभागाच्या सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संचालन तुषार रायपूरे यांनी तर आभार डॉ. पद्ममजा बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला नोडल अधिकारी श्री. मसराम, नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदोरकर, नेत्रचिकित्सा अधिकारी माधुरी कुळसंगे, श्री. ठुब्रिकर, श्री. मडावी, श्री. भैसारे, श्री. मारशेट्टीवार, अतुल शेंद्रे, सुरज वनकर आदी उपस्थित होते.

 

मरणोपरांत नेत्रदान : निशांत जगन्नाथ बोरकर (वय 21) याचे अल्पशा आजाराने निधन झाले असता नातेवाईकांनी दोन अंधांना दृष्टि मिळेल या उदात्त हेतूने निशांतचे नेत्रदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here