जि.प.च्या अर्थसंकल्पात शिक्षण, कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर Ø सन 2024-25 च्या मुळ अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मंजुरी

0
61

जि.प.च्या अर्थसंकल्पात शिक्षण, कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर

 

Ø सन 2024-25 च्या मुळ अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मंजुरी

 

चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सन 2024-25 च्या मुळ अंदाजपत्रकात 28 कोटी 11 लक्ष रुपयांचा महसुली उत्पनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांनवर भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यात शिक्षण, कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणी पुरवठा आदींचा समावेश आहे.

 

शिक्षण विभाग : अर्थसंकल्पात या विभागाकरीता 1 कोटी 3 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन उंचावण्याकरीता इसरो (ISRO/BARC) सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैज्ञानिक संस्थांना भेटी करीता सहलीचे आयोजन करण्याचे नियोजित आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून मिशन भरारी 3.0 राबवून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेकरीता तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. शालेय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची जाणीव निमार्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

आरोग्य विभाग : जि.प. आरोग्य विभागासाठी 4 कोटी 10 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये साथरोग, ग्रामीण भागातील गरजू लोकांना मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटप करणे, दुर्धर आजाराने पिडीत व्यक्तींना शस्त्रक्रिया व औषधोपचार करीता अर्थसहाय्य, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुविधायुक्त करून सुसज्ज करण्यावर भर देण्यात आला.

 

महिला व बालकल्याण विभाग : या विभागाकरीता 1 कोटी 4 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये अंगणवाडी केंद्राचे बळकटीकरण व लहान मुलांच्या शारीरिक विकासाकरीता बाहय परिसरात खेळणी बसविणे, अंगणवाडी केंद्रातील 6 महिने ते 3 वर्ष व 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील मुला/ मुलींना अंगणवाडी केंद्रामार्फत पोषण आहार उपलब्ध करून कुपोषण टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना/ मुलींना सक्षम करण्याकरीता जुडो कराटे, ब्युटी पार्लर, संगणक प्रशिक्षण, शिवणकाम, सायकल वाटप या सारख्या योजना राबवून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे.

 

समाजकल्याण विभाग : या अंतर्गत मागासवर्गीयांकरीता विविध प्रकारच्या वैयक्तीक लाभाच्या योजना व दिव्यांग कल्याणासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद आली आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती करीता तरतूद करण्यात आली आहे.

 

कृषी विभाग : जि.प.च्या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी 1 कोटी 11 लक्षाची तरतूद करण्यात आली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जैविक शेती करीता प्रोत्साहित करून शेतीच्या उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील तलाव दुरुस्ती व सौंदर्यीकरणाकरीता रुपये 1 कोटी 40 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

 

बांधकाम विभाग : या अंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामाकरीता 4 कोटी 17 लक्ष रु. च्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीच्या माध्यमातून गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, याकरिता 2 कोटी 8 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून सोबतच पाणी टंचाईकरीता बोरवेल व हातपंपाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here