*दारु परवाना वितरणातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी*
*पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
*चंद्रपूर, दि.१० – सन २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही त्याचे पुढे काहीच झाले नाही आणि मद्य परवाना वितरणातील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपूर्ण गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.*
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही सांगितले आहे. दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. येणाऱ्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि स्वतःकडेच कुलूपबंद केल्या. अनेक ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही मद्य परवाने देण्यात आले.गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथे तर रमाई आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरी बियर बार देण्यात आला, याकडेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
त्याचवेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) श्री. विश्वास नांगरे पाटील यांनाही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणात कसून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात ज्यांना तक्रारी करायच्या असतील त्यांनी भाजपा जनसंपर्क कार्यालयातील 95527 99608 या मोबाईल नंबर व्हॉट्सॲप तक्रारी पाठवाव्यात. दूरध्वनीवरून प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी तक्रारकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा (7261967820), भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे (9822255932) यांच्याशी संपर्क साधावा.