बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
चंद्रपूर, दि. 10 : शासन निर्णय फेब्रुवारी 2000 अन्वये बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी तथा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती मार्फत चंद्रपूर जिल्हयातील बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यवाहीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी गुरुवारी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, चंद्रपूर महनगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ नयना उत्तरवार, जिल्हा साथरोग अधिकारी मिना मडावी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्हयातील शहरी किंवा ग्रामीण भागातील विना परवानगीने चालविण्यात येणा-या नर्सिग होमची माहिती घेवून अशा नर्सिग होमला शेवटची नोटीस द्यावी तसेच त्यांचे नर्सिग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी. परवानगीनुसार सुरु असलेले नर्सिंग होम तथा दवाखाने परवानगीच्या अटी व शर्ती नुसार चालतात की नाही, शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करतात की नाही, याची सुध्दा तपासणी करण्यात यावी. तसेच या विषयीबाबतची कोणतीही तक्रार आल्यास त्याची तात्काळ चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागास दिले. तसेच समितीमार्फत 33 प्रकरणामध्ये नोंदविण्यात आलेल्या एफ.आय.आर. बाबत पुढील कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना पोलिस विभागास त्यांनी दिल्या. यावेळी नर्सिंग होम तथा मोठया हॉस्पीटल्स मधून होणाऱ्या मेडीव्हेस्टचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
चंद्रपूर जिल्हयातील सदर समितीमार्फत आजपर्यंत 121 धाडी टाकण्यात आल्या असून त्यापैकी 33 प्रकरणामध्ये एफ.आय.आर. नोंदविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी दिली. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे व मनपा आरोग्य अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.