वनवणवा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा
Ø जिल्हाधिका-यांचे वन विभागाला निर्देश
चंद्रपूर, दि. 5 : चंद्रपूर जिल्ह्यातील विस्तृत जंगलव्याप्त क्षेत्र, त्यात असलेली जैवविविधता आणि यंदाच्या उन्हाळ्यातील वाढते तापमान बघता जंगलात वनवणवा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनस्पती आणि वन्यजीव यांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने वनवनणवा टाळण्यासाठी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपायोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात वनवणवा उपाययोजनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, श्वेता बोड्डू, जितेश मल्होत्रा, उपसंचालक श्री. काळे, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित होते.
जंगलात वणवा प्रतिबंधासाठी वन विभागाने सतर्क होऊन काम करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शेताच्या धु-याला लागूनच जंगल असले तर आग पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेतक-यांनी आपल्या शेतातील धुरे जाळतांना कोणती काळजी घ्यावी, याबाबत कृषी विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करावे. तसेच धुरे जाळण्यासाठी शेतक-यांना ठराविक कालावधी नेमून दिला तर त्यावेळी वन विभागाचे कर्मचारी उपस्थित राहू शकतात. जिल्ह्यातील कॉल सेंटरवरूनसुध्दा वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जनजागृती करावी. जंगलालगतच्या गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन संभाव्य वनवणवा टाळण्याबाबत त्यांना सुचना द्याव्यात.
याप्रसंगी वनवणवा प्रतिबंधात्मक कार्यवाही राबविताना एफडीसीएम, ताडोबा बफर तसेच प्रादेशिक वनविभागाने संयुक्त आराखडा तयार करावा. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद यांची मदत घेत वनविभागाने सामुहिक कार्य करावे व संवेदनशील क्षेत्र व सर्वाधिक धोका असलेले क्षेत्राचा विचार करून संपूर्ण उन्हाळा प्रतिबंधात्मक नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
दर 40 वर्षांनी चंद्रपूर जिल्हयातील बांबुला फुलोरा येत असल्याचा इतिहास असून यापूर्वी 1983-84 मध्ये जिल्हयातील वनक्षेत्रातील बांबुला फुलोरा आलेला होता. त्यानुसार मागील एक-दोन वर्षापासून थोड्या थोड्या प्रमाणात बांबु फुलोरा येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा 100 टक्के भाग फुलोऱ्याने व्यापलेला असून, सर्व बांबु मृतप्राय झालेले आहे. सोबतच बांबुच्या रांज्या सुध्दा कोलमडून जमिनीवर पसरलेल्या स्थितीत असल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात विस्तृत जंगलव्याप्त क्षेत्र आहे. यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता वनक्षेत्रात तेंदु, मोहफुल संकलन काळात किंवा शेतशिवारात धुरे जाळताना चुकीने जर आग लागली तर आगीची व्याप्ती वाढून वनक्षेत्राचे, वन्यप्राण्याचे व अधिवासाचे मोठे नुकसान होऊ शकते, असे वनविभागाने कळविले आहे.
००००००००