महाकाली यात्रा नियोजनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

0
104

महाकाली यात्रा नियोजनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला 14 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. यासंदर्भात करावयाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील आदी उपस्थित होते.

महाकाली यात्रेला आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, गर्दी व्यवस्थापनासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने जास्तीत जास्त स्वयंसेवक ठेवावे. भाविकांचा प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. मंदिराच्या परिसरात दोन मतदान केंद्र असल्यामुळे मतदानाच्या अगोदरचा आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात येण्यास बंदी राहणार आहे. याबाबत भाविकांना सूचना देण्यात याव्या. अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसाद, आहारपदार्थांची स्वतंत्र टीम द्वारे तपासणी करावी. निवडणुकीचा कालावधी असल्यामुळे स्वयंसेवकांना ओळखपत्र द्यावे. कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची काळजी घ्यावी.

यात्रेदरम्यान वैद्यकीय व्यवस्था चोख ठेवावी तसेच पुरेसे आरोग्य बुथ लावावे आणि औषधी साठा उपलब्ध ठेवावा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, आपला दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर वैद्यकीय संस्थांची माहिती प्रसारीत करावी. मंदिर परिसरात नियंत्रण कक्षाची स्थापन करून यात पोलिस, चंद्रपूर महानगर पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांची ड्यूटी लावावी. यात्रेदरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होता कामा नये. काही दुरुस्तीची कामे असल्यास आताच करून घ्यावी. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बाहेरून येणा-या भाविकांना उष्माघात बाबत घ्यावयाची काळजी, याबाबत परिवहन महामंडळाने बसेस मध्ये पोस्टर लावावले. घनकचरा व्यवस्थापन, शौचालयाची व्यवस्था व त्याची नियमित स्वच्छता महानगर पालिका प्रशासनाने करावी.

सध्या निवडणुकीचा काळ असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. या कालावधीत धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी नसली तरी अशा उपक्रमाचा राजकीय प्रचारासाठी उपयोग होता कामा नये, याबाबत विश्वस्त मंडळाने दक्षता घ्यावी, अशाही सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here