*१८ मार्च रोजी रक्तदान शिबिर*
*सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, शाखा वरोरा यांच्या वतीने आयोजन*
रक्तदान हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे. एक रक्तदाता म्हणून सांगायला आवडेल, की रक्तदानासंबंधी जी काही जणांच्या मनात भीती असते ती तुम्ही प्रत्यक्ष रक्तदान केल्यावरच जाऊ शकते. रक्तदानासारखं कोणतंही श्रेष्ठ दान नाही. त्याचा आनंद प्रत्येकानं घ्यायला हवा.
संवेदनशील वक्ती म्हणून रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आहे. आपलं रक्त कधी कोणाला उपयोगी पडेल हे सांगता यायचं नाही. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसंच आपलं रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतं. रक्तदान केल्यावर आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा घटक वाया जाईल असं काहींना वाटतं. पण तसं नाहीय. रक्तदानानंतर काही तासांतच आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्तदानातून उत्तम समाजसेवा करता येते. आपल्या देशात अनेक अपघात होत असतात. त्यात जखमी होणाऱ्यांना रक्ताची तातडीची गरज लागत असते. त्या अपघातग्रस्ताला वेळेवर रक्त उपलब्ध झालं तर त्याचा जीव वाचतो. रक्त कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये निर्माण करता येत नाही. त्यामुळे आपण रक्तदान करून अपघातग्रस्तांचा, रुग्णांचा जीव वाचवला पाहिजे. या उदात्त हेतूने प्रेरित होऊन
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा वरोरा यांच्या वतीने सोमवार, दिनांक १८ मार्च २०२४ रोजी वरोरा रेल्वे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या वतीने अध्यक्ष राकेश कुमार यांनी सांगितले की, ‘रक्तदान, महादान ‘ आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे कुणाचाही जीव जाणार नाही, या उद्देशाने वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.०० वाजता होणार असून शिबिर सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी इच्छुकांनी संघाशी संपर्क साधावा. शिबिराच्या यशस्वितेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा वरोरा अध्यक्ष राकेश कुमार, कार्याध्यक्ष विनोद कुमार, सचिव बी.के. भुयान, कोषाध्यक्ष आशिष हरणे आदींनी केले आहे.