पोंभुर्णा येथे 42 कोटी 92 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन*

0
162

*पोंभुर्णा येथे 42 कोटी 92 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन*

 

*पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे पोंभुर्णा तालुका विकासात अग्रेसर*

 

*चंद्रपूर, दि. 12 : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, भुमी अभिलेख कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण तसेच आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या भूमिपुजनासह तालुक्यातील आठ पुलांचा पायाभरणी सोहळा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला.*

 

कार्यक्रमाला गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, प्रदेश सचिव आशिष देवतळे,माजी भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार,पोंभुर्णाच्या सरंपचा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार,सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, भुमी अभिलेख विभागाचे जिल्हाअधिक्षक भूषण मोहिते, सह. जिल्हा निबंधक अंकिता तांदळे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विकास जिडगलवार, उपभियंता नितीन मुत्त्यलवार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सचिव अनिल बोरगमवार, कोषाध्यक्ष राजीव गोलीवार, विनोद देशमुख, अजय मस्के,गुरुदास पिपरे, दर्शन गोरंतीवार आदी उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, येथील नागरिकांनी या क्षेत्राचा विकास करण्याचे दायित्व माझ्यावर सोपविले आहे. कधी नव्हे इतका निधी पोंभुर्णा तालुक्याच्या विकासाकरीता खर्च करण्यात आला आहे. आज येथे 42 कोटी 92 लक्ष रुपये खर्च करून विविध कार्यालयाचे लोकार्पण, आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपुजन आणि पाणंद रस्त्यावरील आठ पुलांच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली आहे. यापूर्वीसुध्दा पोंभुर्णा येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज सभागृह, महात्मा ज्योतिबा फुले सभागृह आणि वीर शहीद बाबुराव शेडमाके यांचे सभागृह बांधण्यात आले आहे.

 

पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, कमी लोकसंख्या असतांनासुध्दा पोंभुर्णा तालुक्यात विकासाची अनेक कामे करण्यात आली आहे. नगर पंचायतीच्या रस्त्यांकरीता तसेच ड्रेनेजसाठी पुन्हा 6 कोटी 40 लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील सर्वात जलद विकास बल्लारपूर क्षेत्राचा झाल्याचा आनंद आहे. यापुढेही पूर्ण शक्तीने विकास कामे करण्याकरीता आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

 

*पोंभुर्णा तालुक्यात या विकासकामांचे झाले लोकार्पण, भुमिपूजन आणि पायाभरणी* : पोंभुर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे लोकार्पण (80 लक्ष), भूमी अभिलेख कार्यालय लोकार्पण (1 कोटी 86 लक्ष), आणि पोंभुर्णा येथे दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण (1 कोटी 14 लक्ष), आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाचे बांधकाम करणे (13 कोटी 54 लक्ष), आदिवासी मुलींची शासकीय वसतीगृहाचे बांधकाम करणे (13 कोटी 54 लक्ष), यासह पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी ते बोर्डा बोरकर येथील स्मशानभूमी जवळ नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे, घनोटी नं. 1 ते आंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्यावर पुलाचे बांधकाम, घनोटी नं. 2 ते आंबेधानोरा येथील मोठया नाल्यावर पुलाचे बांधकाम, सातारा भोसले ते बालाजी तलावपर्यंत जाणाऱ्या मार्गावर पुलाचे बांधकाम, बोर्डा दीक्षित ते बोर्डा झुल्लुरवार रोडारील नाल्यावर पुलाचे बांधकाम, सातारा भोसले स्मशानभूमी ते बालाजी तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम, जामखुर्द ते जानाळा रोडवर पुलाचे बांधकाम, दिघोरी ते वेळवा मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे याप्रमाणे प्रत्येकी 1 कोटी 50 लक्ष रुपये प्रति पूल असे एकूण 12 कोटी रुपयांच्या पुलाचे बांधकाम भुमिपूजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here