*वाचन संस्कृती टिकवण्यासाठी स्थापन व्हावा वाचकांचा क्लब* *ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा*

0
83

*वाचन संस्कृती टिकवण्यासाठी स्थापन व्हावा वाचकांचा क्लब*

 

*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा*

 

*चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन; राज्य भरातील सर्व ग्रंथालये जोडली जावी*

 

*चंद्रपूर, दि.२४:* ज्या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्मिक, वैचारिक योगदान देताना वाचन संस्कृतीचे, पुस्तकांचे महत्त्व सांगितले. आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मात्र दुर्दैवाने वाचन संस्कृती मात्र लोप पावत आहे. ही वाचन संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला वाचकांचे क्लब स्थापन करावे लागतील, अशी सूचना वजा अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) व्यक्त केली.

 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरदराव सालफळे होते. तर प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नरक्षित शेंडे, रत्नाकर नलावडे, अनिल बोरगमवार, नामदेव राऊत, प्रा. श्याम मोहरकर, सुदर्शन बारापात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. मानसिक भूक भागविण्यासाठी वाचकांचा क्लब स्थापन करण्याचा विचार करावा. उद्या या सभागृहातील ग्रंथोत्सव चांदा क्लब ग्राऊंडवर होईल तेव्हा मला अधिक आनंद होईल.’ ज्याने फेसबुकला जन्म दिला तो मार्क झुकेरबर्ग छान झाडाखाली बसून पुस्तके वाचतोय आणि आपले भारतीय विद्यार्थी फेसबुकवर व्यस्त आहेत, असे मी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सएपवर वाचले होते. ही खरे तर आपल्यासाठी विडंबनात्मक स्थिती आहे, असेही ते म्हणाले. ‘मी आमदार झालो तेव्हा वाचनालय सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाचनालये सुरू केली. आणखी नवीन वाचनालये सुरू करणार आहे. २०१५ मध्ये माझ्या विभागातर्फे जीआर काढून कार्यक्रमांमध्ये ‘बुके नव्हे बुक द्या’ असा नियम केला. आता जागा अपुरी पडत आहे, इतकी पुस्तके झाली आहेत. हजारो पुस्तके माझ्याकडे आहेत. मी निवृत्त होईल तेव्हा ही पुस्तकेच माझ्यासाठी धावून येतील,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

 

*‘ग्रंथालयांमध्ये एकसूत्रता यावी’*

 

ग्रंथालयांच्या अंतर्गत सर्व व्यवस्थांमध्ये एकसूत्रता आणण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालये एका सॉफ्टवेअरने जोडली तर अधिक सोयीचे होईल. एखाद्या ग्रंथालयात एखादे पुस्तक नसेल तर महाराष्ट्रातील कोणत्या ग्रंथालयात ते उपलब्ध आहे, हे कळू शकले पाहिजे. त्यावर पुस्तकांना रेटिंग देण्याची सोय असावी. अमेझॉनच्या धरतीवर हे काम करणे शक्य आहे, अशा सूचना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. जिल्हाभरात जनजागृतीसाठी स्पर्धा घेता येतील का, याचाही विचार करावा, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here