सण-उत्सवाच्या काळात जमावबंदी आदेश जारी
अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यात येत्या काळात सण उत्सव साजरे होणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
सदर आदेशाची अंमलबजाणी करण्यासाठी सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 36 मधील पोटकलमानुसार कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असल्यास किंवा अडथळ्यांचा संभव असल्यास अडथळा होऊ देऊ नये, मिरवणूकांचे मार्ग विहित करणे, मोर्चे, निदर्शने, सभा, पदयात्रा, वाद्यांबाबत नियम आणि नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.